सांजवार्ता विशेष : दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण, पाचशे घरांची बुकिंग; शंभरहून अधिकांचे गृहप्रवेश

Foto
उज्ज्वला साळुंके

छत्रपती संभाजीनगर: साडे तीन मुहूर्तापैकी एक समजला जाणारा मुहूर्त म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त. दसऱ्याच्या मुहूर्तावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर घरांची बुकिंग आणि खरेदी केली जाते. ही परंपरा यंदाही कायम ठेवली असून यंदा घर खरेदीवर ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांचे नवीन घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आज जवळपास पाचशे घरांची बुकिंग आणि शंभर ते दिडशे गृहप्रवेश करण्यासाठी अनेकांनी आजचा दसऱ्याचा मुहूर्त साधला असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष संग्राम पठारे यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना दिली.

दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांजण नवीन वस्तू खरेदीवर भर देत असतात. त्यात अनेकजण नवीन घरात प्रवेश करण्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त साधतात. तर अनेकजण घर बुकिंग करण्यावर भर देतात. याशिवाय अनेकजण व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन प्रॉपर्टी खरेदी करून त्याचे पूजन दसऱ्याच्या दिवशी करतात. त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिकांमध्ये चांगला उत्साह असतो. यंदाही दसऱ्याच्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिकांमध्ये चांगला उत्साह आहे. यंदा ग्राहकांकडून नवीन घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच झालेल्या बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईच्या वतीने एकाच छताखाली सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीची माहिती मिळावी यासाठी ड्रीमहोम एक्स्पो प्रदर्शन भरविण्यात आले. त्यातही ग्राहकांनी चांगला प्रतिसाद देऊन घर बुकिंग केले. तर अनेकांनी प्लॉट खरेदीवर भर दिला. यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर पाचशे घरांची बुकिंग होईल. तर शंभर ते दिडशे  गृहप्रवेश होत आहेत.

दहा टक्के खरेदीत वाढ


दिवसेंदिवस दिवस वाढत असलेल्या घरांच्या किंमती यामुळे अनेकजण आता घर खरेदी करण्यावर भर देत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर घर खरेदीवर अनेकांकडून भर दिला आहे. तसेच बुकिंगही चांगल्याप्रकारे झाल्या आहेत. यंदा रो हाऊस आणि टू बीएच के फ्लॉटला चांगली मागणी आहे. तसेच प्लॉट खरेदीवरही अनेकांनी भर दिला आहे. त्यामुळे एकंदरीतच दसऱ्याच्या मुहूर्तावर यंदा घर खरेदी चांगली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसाठी देखील यंदाचा दसरा उत्सव उत्तम ठरला आहे. तसे पाहिले तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा दसरा चांगला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घर खरेदी दहा टक्क्यांनी वाढली आहे.

यंदा प्रतिसाद चांगला आहे: संग्राम पठारे


घर खरेदीवर मोठ्या प्रमाणावर ग्राहक भर देत आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये उत्साह चांगला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घर खरेदीत वाढ झाली आहे. अनेकांनी क्रेडाईच्या ड्रीमहोम प्रदर्शनातही घरांची बुकिंग केली होती. तर अनेकांनी त्यानंतर घरांची बुकिंग केली. तसेच काहीजण आज दसऱ्याच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करून घराचे स्वप्न साकार करतील. एकंदरीतच यंदा घर खरेदीला दसऱ्याचा मुहूर्त साधत ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष संग्राम पठारे यांनी स्पष्ट केले.